गेवराई – दि 18 ( वार्ताहार ) चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथील एका अल्पवयीन मुलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पर जिल्ह्यातील तरुणाने जाळ्यात ओढले व तिला फूस लावून जबरदस्तीने पळून नेण्याचा प्रयत्न झाला परंतु सदर पीडित मुलीच्या ओरडण्यामुळे सदरचा प्रकार टळला असून पोबारा करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या दोघांना चकलांबा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सध्या होत असलेला बेसुमार सोशल मीडियाचा वापर व त्यामुळे होणारे दुष्परिणाम सध्या समाजातील सर्वच घटकांना अनुभवायास मिळत आहेत. सोशल मीडियाच्या गैर वापरामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण अडचणीत येत असल्याचे आपणास पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे अल्पवयीन मुलांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे सावट ओढवल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारची घटना काल उमापूर येथे एका अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडली असून सदर पीडित अल्पवयीन मुलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढून तिला वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखवून फुस लावून जबरदस्तीने पळून नेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु सदर पीडित मुलीच्या ओरडण्यामुळे व उमापुरातील जागरूक नागरिकांमुळे सदरचा प्रकार आणून पाडण्यास पोलिसांना यश आले असून पोलिसांना सदर घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ टीम रवाना केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवत दोन्ही आरोपींना वापरलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेऊन व पीडित मुलीची आरोपीच्या ताब्यातून सुटका करून व तिला अभय देऊन पोलीस स्टेशन येथे आणून सदर घटनेची सविस्तर चौकशी करून पीडित मुलीच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पीडित मुलीच्या व तिच्या आईच्या जबाबवरून पोलीस ठाणे चकलांबा येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे 1) समाधान उर्फ अभिजीत नागनाथ ठोंगे (वय-26) 2) प्रमोद बाळासाहेब लोखंडे (वय-29) दोन्ही रा.हिंगणगाव ता.परांडा जि.उस्मानाबाद यांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकाचे प्रमुख एपीआय साबळे हे करत आहेत. सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पीएसआय तांगडे, सफौ एकाळ, पोह पवार, पोह कुलकर्णी यांनी केली आहे.