January 23, 2025

टिपरे आणि सोंग या लोककलेला विजयसिंह पंडित यांनी राजाश्रय दिला – अ‍ॅड सुभाष निकम

टिपरे महोत्सवात जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदविण्याचे शारदा प्रतिष्ठान कडुन आवाहन

गेवराई दि.३० ( वार्ताहार ) टिपरे आणि सोंग या गेवराई शहराच्या प्राचिन कला अविष्काराला
विजयसिंह पंडित यांच्यामुळे राजाश्रय मिळाला आहे. शहरातील खेळाडु आणि कलावंतामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षीच्या टिपरे महोत्सवात विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातुन पारितोषिकांच्या रकमेमध्ये घसघसीत वाढ करण्यात आली आहे. सांघीक पारितोषिकांसह वैयक्तीक कलावंतांचाही गौरव शारदा प्रतिष्ठान करणार आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिक्षकांनी नियमावली तयार केली असुन गेवराईच्या लोककलेचा वारसा जपण्यासाठी जास्तीत जास्त टिपरे संघ व सोंग कलावंतांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन अ‍ॅड. सुभाष निकम यांनी केले आहे. टिपरे महोत्सवाच्या आयोजनासाठी आयोजित पुर्वतयारी बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी परिक्षकांसह आयोजन समिती सदस्य होते.

बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतुन शारदा प्रतिष्ठानच्या वतीने वतीने सालाबादाप्रमाणे याहीवर्षी नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी मंगळवार दि. २२ ऑगस्ट रोजी सायं. टिपरे महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेचे मुख्य परिक्षक अ‍ॅड. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली, या बैठकीला परिक्षक मंडळाचे सदस्य प्रशांत रुईकर, विलास सोनवणे, प्रकाश भुते, राजेंद्र बरकसे यांच्या सह टिपरे संघ प्रतिनिधी महेश मोटे उपस्थित होते. बैठकीमध्ये महोत्सवाच्या भव्य आणि शिस्तबद्ध आयोजना बाबत सविस्तर चर्चा झाली. टिपरे संघातील खेळाडु आणि सोंग कलावंतांच्या मागणी नुसार यावर्षीपासुन स्पर्धेतील पारितोषिकांच्या रकमांमध्ये घसघसीत वाढ करण्याचा निर्णय विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातुन करण्यात आला. महिला आणि जेष्ठ नागरीकांसाठी विशेष बैठक व्यवस्था करण्या बाबतही चर्चा करण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या संघांसह सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

टिपरे महोत्सवातील स्पर्धेमध्ये प्रथम संघाला २१ हजार, द्वितीय संघाला १५ हजार, तृतीय संघाला ७ हजार या शिवाय उत्कृष्ट संघाला उत्तेजनार्थ ३ हजार रुपये प्रमाणे दोन संघांना पारितोषिक दिले जाणार आहे. सांघिक बक्षिसांसह टिपरे संघातील उत्कृष्ट कला सादरीकरण (पात्र सजावट) यासाठी प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार आणि उत्तेजनार्थ दोन खेळाडुंना प्रत्येकी १ हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. सोंग कला सादरीकरणामध्ये उत्कृष्ट सोंगधारी कलावंतासाठी वैयक्ती प्रथम ३ हजार, द्वितीय २ हजार, तृतीय दिड हजार आणि उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. उत्कृष्ट वाद्य वादन (वैयक्तीक) या प्रकरामध्ये प्रथम २ हजार, द्वितीय दिड हजार, तृतीय १ हजार आणि उत्तेजनार्थ दोन कलाकारांना प्रत्येकी ७०० रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. विजेत्या संघांसह वैयक्तीक विजेत्यांना रोख रकमेसह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते देवुन गौरविण्यात येणार असल्याची माहिती शारदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातुन सुरु झालेल्या टिपरे महोत्सवामुळे गेवराई शहरातील कलावंतांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन यावर्षी शहराच्या गल्लोगल्ली मध्ये टिपरे संघ सराव करतांना दिसत आहेत. यावर्षीचा महोत्सव यशस्वी करण्यासाठी टिपरे संघ व सोंग कलावंतांनी आपली नोंदणी प्रा. बाबु वादे यांचा संपर्क क्रमांक ७५८८६३५११२ आणि ओम मोटे यांचा संपर्क क्रमांक ९४२०८७४५७८ या क्रमांकावर करावी असे आवाहनही शेवटी शारदा प्रतिष्ठान कडुन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *