April 19, 2025

नितीमत्ता असणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे – गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे

जयभवानी विद्यालयात शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

गेवराई दि.२४ ( वार्ताहार ) शिक्षण घेत असताना जो प्रयत्न करतो तोच पुढे जातो, विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न आणि चिकाटी यात सातत्य ठेवा. कोणत्याही क्षेत्रात जा आणि चांगले वागा. उत्तम नागरिक बनविण्यासाठी आज विद्यार्थ्यांना नितीमत्ता असणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे यांनी केले. जयभवानी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थाअंतर्गत संस्थेच्या विविध विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवाजीनगर गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवार दि.२४ जुलै रोजी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंत राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून गेवराईचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय शिंदे, उपमुख्याध्यापक रणजित सानप, पर्यवेक्षक कैलास गायकवाड, जेष्ठ शिक्षक सुदाम शेजाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य वसंत राठोड यांनी शिक्षण परिषद आयोजित करण्या मागची भुमिका विषद केली.
पुढे बोलताना नवनाथ सोनवणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार शिक्षण घ्यावे. शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्वाचे आहे, त्या दिशेने शिक्षकांना विद्यार्थी दैवत समजून त्यांना उत्तम नागरिक बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आतापासून अभ्यासाला प्रारंभ करावा. कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात करिअर करावे. आयुष्यात कधीही कॉपी करुन आपल्या जिवनाचे वाटोळे करु नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांन प्रश्न विचारले. मान्यवरांनी सर्वांच्या प्रश्नांचे समर्पक उत्तर देऊन त्यांचे शंका निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यप्रेम लगड यांनी केले तर आभार पर्यवेक्षक कैलास गायकवाड यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *