January 22, 2025

गुणवत्तेला संधी आणि मार्गदर्शन मिळवुन देण्याचे काम शारदा प्रतिष्ठान करत आहे – अमरसिंह पंडित

एमपीएससी मधील यशस्वी उमेदवारांचा शारदा प्रतिष्ठान कडुन गौरव

गेवराई ( वार्ताहार ) दि. २३  गुणवत्ता ही ठरावीक लोकांची मक्तेदारी राहीली नसल्याचे गेवराई तालुक्यातील तरुणांनी सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तेला संधी, साधन सुविधा आणि योग्य मार्गदर्शन करण्याचे काम शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन केले जात आहे. शिकणार्‍यांना थांबवु नका आणि शेती विकू नका असे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले. एमपीएससी मधील यशस्वी भुमीपुत्रांचा गौरव करतांना ते बोलत होते. शारदा प्रतिष्ठान कडुन नेत्रदिपक कार्यक्रमात एमपीएससी मधील यशस्वी उमेदवारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

शारदा प्रतिष्ठान आणि र.भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १५ जुलै रोजी गेवराई तालुक्यातील एमपीएससी परिक्षेत यशस्वी भुमीपुत्रांचा अमरसिंह पंडित यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शारदा प्रतिष्ठानकडुन चालविण्यात येणार्‍या मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्ध्यांसह गेवराई तालुक्यातील कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, जगन्नाथ शिंदे, प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक कृष्णा ढाकणे, बदाम सिरसाट, सुरज आहेर, लक्ष्मण माने, शुभम कोरडे, सौ. अनिता गावडे, विक्रीकर निरीक्षक वैभव पुरी, सहाय्यक अभियंता कृष्णा शिंदे आणि दिवाणी न्यायाधिश हसीम महंमद बेग यांचा कुटूंबीयांसह मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की,
ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी गावागावात अभ्यासीका आणि ग्रंथालये सुरु करण्यासाठी अग्रह धरला पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता आहे या गुणवत्तेला संधी देण्याचे काम आपण केले पाहिजे. गेवराईत निट परिक्षेच्या पुर्वतयारीसाठी लवकरच क्लासेस सुरु करत आहोत. स्पर्धा परिक्षेची पुर्वतयारी करण्यार्‍या तरुणांसाठी तालुक्यात पोषक वातावरण तयार होत आहे. आज ज्यांचा सत्कार या कार्यक्रमात होत आहे त्यांच्या पासुन इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. प्रत्येक यशस्वी उमेदवार अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतुन यशस्वी झाला आहे याची जाणीव इतरांनी बाळगली पाहिजे. गेवराईची ओळख अधिकार्‍यांचा तालुका म्हणुन व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यशस्वी उमेदवारांनी भविष्यात अधिकारी म्हणुन काम करतांना त्यांच्यासाठी कष्ट घेणार्‍या आई-वडीलांचा विसर पडु देवु नये असे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात शेवटी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी केले.

प्रातिनिधीक स्वरुपात बोलतांना पोलीस उपनिरीक्षक बदाम सिरसाट म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर अमरसिंह पंडित यांनी गेवराई शहरात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यांच्यामुळे भविष्यात गेवराईची ओळख अधिकार्‍यांचा तालुका म्हणुन नक्की होईल, तर सहाय्यक अभियंता कृष्णा शिंदे म्हणाले की, जयभवानी हायस्कुल गढी सारख्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकुन आम्ही अधिकारी झालो आहोत, कष्ट केल्याने फळ नक्की मिळते, स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दोहोंनी अमरसिंह पंडित आणि शारदा प्रतिष्ठानचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधव चाटे यांनी केले. कार्यक्रमाला विविध संस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *