January 22, 2025

शेतकऱ्यांना गरजेच्यावेळी तरी अनुदान द्या

रखडलेल्या अनुदानप्रश्नी अमरसिंह पंडित यांचा आंदोलनाचा इशारा

गेवराई, दि.३० ( वार्ताहार ) – मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा अतिवृष्टी होण्याची वेळ आली तरीही अनुदान मिळत नाही, ऑनलाईनच्या नावाखाली शेतकरी बँक आणि तहसिल कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत. सध्या खत, बि-बीयाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नाहीत, किमान शेतकऱ्यांच्या गरजेच्यावेळी तरी अनुदानाची रक्कम मिळू द्या, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी दिला. सन २०२२ च्या थकीत अतिवृष्टी अनुदान वाटपासाठी त्यांनी तहसिलदारांची शिष्टमंडळासह भेट घेवून लेखी निवेदन दिले.

सन २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने बाधित गेवराई तालुक्यातील एक लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांना शासनाने अनुदान मंजुर केले होते. अद्याप अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही, या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शुक्रवार, दि.३० जून रोजी शिष्टमंडळासह तहसिलदार संदिप खोमने यांची भेट घेवून त्यांना लेखी निवेदन दिले. आधार कार्ड इनॲक्टिव असणे, मयत शेतकऱ्यांचे फेरफार रखडणे, अंगठ्याचे ठसे मिसमॅच होणे यांसह अनेक कारणे देवून शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले जात आहे. शासन, प्रशासन आणि बँक यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहत असल्याचा आरोप अमरसिंह पंडित यांनी यावेळी केला.

शासनाने केवळ घोषणांचा पाऊस पाडत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. घोषणा करूनही वर्षभराच्या कालावधीत शासन शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप करत नसेल तर शासनाचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे सिध्द होत आहे. सध्या पेरणीचे दिवस असून शेतकऱ्यांना बि-बीयाणे, खते खरेदीसाठी पैशांची गरज आहे, एकीकडे बँका पिक कर्ज देत नसल्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना खाजगी सावकारांच्या दारात जाण्याची वेळ येत आहे. किमान शेतकऱ्यांच्या गरजेच्यावेळी तरी त्यांना अनुदानाची रक्कम मिळू द्या, ऑनलाईन कि ऑफलाईन असा घोळ न घालता सरसकट सातबारा असलेल्या खातेदार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वाटप करा अशी मागणी अमरसिंह पंडित यांनी यावेळी केली. मागील वर्षीचे अनुदान लवकरात लवकर वाटप न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्विकारले असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, जय भवानीचे संचालक कुमारराव ढाकणे, माजी संचालक रमेशलाल जाजू, झोपडपट्टी संघर्ष समितीचे कडुदास कांबळे, माणिक आडाळे, अजय पंडित, जगदिश मडके, उप सरपंच मुकेश बोराडे, संतोष चव्हाण, बळीराम साबळे, नंदकुमार पवार, संभाजी पवार, जयराम पवार, नागोराव चव्हाण, विठ्ठल चव्हाण, जनार्धन चव्हाण, महेश मराठे, संतोष खेत्रे, शेख मोबीन आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *