January 22, 2025

गढी नळ योजनेचे काम दर्जेदारच

मंत्र्यांकडून विधानसभेत सुतोवाच

गेवराई दि ३१ ( वार्ताहार  ) आमदारांच्या तक्रारीनंतर टाटा कन्सल्टन्सी सारख्या त्रयस्त संस्थेकडून गढी नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करण्यात आली असून त्यांनी हे काम दर्जेदार झाल्याचा अहवाल दिला आहे. आ.लक्ष्मण पवार यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला पाणीपुरवठा मंत्र्यांनी उत्तर देताना या बाबतची माहिती दिली. प्रती मानसी ५५ लिटर क्षमतेची वाढ नवीन योजनेत करण्यात आल्याचे सांगून या कामात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे सुतोवाच मंत्र्यांनी विधानसभेत केले आहे. त्यामुळे गढी नळ योजनेचे काम दर्जेदारच झाल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सरपंच अंकुश गायकवाड यांनी दिली आहे.

गेवराई तालुक्यातील गढी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासंदर्भात आ.लक्ष्मण पवार यांनी लेखी तक्रार केली होती. याबाबत विधानसभेत त्यांनी तांराकित प्रश्न उपस्थित केला. आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी गढी नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासंदर्भात आमदारांच्या तक्रारीवरून टाटा कन्सल्टन्सी सारख्या त्रयस्त यंत्रणेकडून चौकशी केल्याचे सांगून या कामात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले. ज्या व्यक्तिने अंदाजपत्रक तयार केले त्याच व्यक्तिला कामाचे कंत्राट मिळाले, या आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्यातही तथ्य नसल्याचे मंत्री महोदयांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे गढी नळ योजनेचे काम दर्जेदार झाल्याचे विधीमंडळातील चर्चेवरून सिध्द झाल्याचा आनंद आम्हास असल्याची माहिती गढी ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुशराव गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सोशल मिडीयावर विधीमंडळातील उपस्थित केलेल्या प्रश्नाची एकतर्फी चित्रफित प्रसारीत करण्यात आली आहे. वास्तविक या चर्चेला मंत्री महोदयांनी दिलेले उत्तर आणि सन्माननीय सदस्यांनी घेतलेला सहभाग हेही सर्वसामान्य लोकांना कळणे महत्वाचे आहे. प्रश्नादरम्यान जय भवानी सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला, मात्र या बाबतही कोणतेही तथ्य एकंदरीत चर्चेत आढळून आले नाही. विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने सुध्दा त्यांच्या अहवालातील पान क्र.१८ वर गढी येथील कामाची गुणवत्ता व दर्जा चांगली असल्याचे मत नोंदविले आहे. त्यामुळे केवळ राजकीय स्वार्थापायी गढी येथील योजनेची व कामाची बदनामी केली जात आहे. खऱ्या अर्थाने सुमारे ६५ कोटी रुपये खर्च करून गेवराई शहराला पाणी मिळत नसल्याचा प्रश्न विधीमंडळात उपस्थित करण्याची आवश्यकता होती, मात्र आपले ठेवायचे झाकून… या उक्तीप्रमाणे ते वागत असल्याचा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.

सरपंच अंकुशराव गायकवाड यांनी विधीमंडळातील सदस्य तथा माजीमंत्री धनंजय मुंडे व आ.प्रकाशदादा सोळुंके यांचे आभार व्यक्त करताना गढी नळ योजनेतून टंचाई काळात तालुक्याला पाणीपुरवठा करून देणे तसेच चांगल्याला चांगले म्हणण्याचे मुद्दे सभागृहात उपस्थित करून त्याबद्दल गढी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त केले. एकंदरीत गढीची योजना दर्जेदार असल्याबाबत विधीमंडळात शिक्कामोर्तब झाल्यामुळे आम्ही ग्रामस्थ आनंदी असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले, यावेळी उपसरपंच मंगेश कांबळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *