संसद सचिवालय दिल्लीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला बीडचा राहुल गिरी निमंत्रीत

संसद भवन दिल्ली येथे राष्ट्रीय भाषण प्रतियोगीता कार्यक्रमात करणार महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व

गेवराई दि २९ ( वार्ताहार ) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमीत्त दिल्ली येथिल संसद भवनच्या मुख्य हॅालमध्ये दिनांक ३१ ॲाक्टोबर २०२२ रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रमाला महाराष्ट्रातून एकमेव बीडचा राहुल गिरी हा तरूण संसद सचिवालयाच्या वतीने निमंत्रीत असून सदरील कार्यक्रमात सहभाग नोंदवणार आहे. नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय भाषण प्रतियोगितेशी संबंधीत असलेल्या देशभरातील २५ तरूणांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण प्राप्त झालेले असून देशातील २५ तरूणांमध्ये महाराष्ट्र राज्यातून एकमेव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याचा भूमिपुत्र राहूल गिरी याची निवड होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

आपल्या अभ्यास, प्रभावी वक्तृत्व व एकूणच कर्तृत्वाच्या बळावर सततच चमकदार कामगिरी करत असलेला राहुल गिरी हा तरूण गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव या गावचा असून त्याने आजपर्यंत राज्यातील शेकडो राज्यस्तरीय वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांवर आपले नाव कोरले आहे. पुण्याच्या नामांकित कर्वे इन्स्टीट्यूट मधून समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन, आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अतिशय कमी वयात तो पी.एच.डी. चे शिक्षण घेत असून तो पहिल्याच प्रयत्नात सेट उत्तीर्ण आहे. महाराष्ट्रातला नव्या आघाडीचा वक्ता म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल गिरी संसद भवन दिल्ली येथिल या शासकिय कार्यक्रमात सहभाग नोंदवून बीडकरांची मान उंचावत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या तरूणाला संसद सचिवालयाच्या वतीने मोफत विमान प्रवास, तीन दिवसीय वेस्टर्न कोर्ट येथिल शासकिय निवास व इतर सोय आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहात संपन्न होणा-या महत्वपूर्ण कार्यक्रमात सहभागाचे निमंत्रण या बाबी नवतरूणांना प्रेरित करणाऱ्या आहेत. दि. ३१ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तो उद्या औरंगाबाद येथून विमानाने दिल्लीला रवाना होणार असून संसद सचिवालयाच्या वतीने त्याची सर्व सोय केलेली आहे. दरम्यान या कामगिरी बद्दल राहुल गिरी यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *