धनुष्यबाणाचा फैसला आज, एकनाथ शिंदेंच्या तलवारीची चर्चा का? प्लॅन बी?
बीकेसीतील मेळाव्यात शिंदेंच्या हस्ते 51 फुटी तलवारीचं भव्य पूजन करण्यात आलं. तर अयोध्येतील महंतांनी शिंदेंना गदा भेट दिलीय.
मुंबई दि ७ ( वार्ताहार ) धनुष्यबाण कुणाचा? एकनाथ शिंदेंचा की उद्धव ठाकरेंचा, हा फैसला आज होण्याची शक्यता आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही पक्षांना कागदपत्र सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षावर दावा सांगणारे पुरावे सादर करण्यात आले आहेत. एकिकडे आयोगामार्फत धनुष्यबाण हे चिन्हच गोठवलं जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिंदेंनी बीकेसीतल्या मेळाव्यात पूजन केलेल्या 51 फुटी तलवारीची जास्त चर्चा रंगतीय. एवढ्या भव्य प्रमाणात ‘तलवार’ याच शस्त्राचं पूजन का करण्यात आलं, यावर राजकीय वर्तुळात खल सुरु आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचं चिन्ह कुणाचं, हा फैसला निवडणूक आयोगातर्फे लवकर घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी तशी शक्यता वर्तवली आहे.या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करण्यासाठी दोन्ही गटांनी नेमकं कोणतं चिन्ह वापरायचं की दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवायची, हा फैसला आज केला जाईल.संख्याबळ कुणाचं हा निकष निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचा मानला जाणार आहे. शिंदे गटाने एक 26 जूनला ठराव पास केलाय. यात 55 पैकी 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्य नेता तसंच अध्यक्ष निवडलं आहे.तर शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनीही 18 जुलै रोजी ठराव करून शिंदेंना मुख्य नेता आणि अध्यक्ष निवडलंय.शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेनंही18 जुलै रोजी ठरावाद्वारे शिंदेंनाच मुख्य नेता निवडलंय.28 ऑगस्टपर्यंत शिवसेनेच्या 1 लाख 20 प्राथमिक सदस्यांसह 144 पदाधिकाऱ्यांचं प्रतिज्ञा पत्रही सादर करण्यात आलंय.29 सप्टेंबरपर्यंत 11 राज्यांचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष यांनी शिंदेंनाच मुख्य नेता तसंच अध्यक्ष म्हणून निवडल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलंय.
बीकेसीतील मेळाव्यात शिंदेंच्या हस्ते 51 फुटी तलवारीचं भव्य पूजन करण्यात आलं. तर अयोध्येतील महंतांनी शिंदेंना गदा भेट दिलीय. त्यामुळे या चिन्हावरूनही चर्चा सुरु आहे.तर उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात व्यासपीठासमोरच वाघाचं चिन्ह होतं. शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात धनुष्यबाणासह वाघ चिन्ह असतं. पण दसरा मेळाव्यात ते अधिक मोठ्या आकारात दाखवण्यात आलंय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर शिवसेना वाघ या चिन्हाची मागणी करू शकते. एकूणच धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं तर दोन्ही गटांनी प्लॅन बी तयार ठेवलाय, अशी चर्चा सुरु आहे.