गेवराई दि 27 ( वार्ताहार ) बीड व गेवराई उमापुर, गुळज , व लक्ष्मीआई तांड्यावरील अनेकांना भगरीतून विषबाधा झाल्याची घटना काल समोर आल्यानंतर अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी मंगळवारी (दि.27) रात्री 8 च्या सुमारास गेवराईच्या मोंढा भागातील एका दुकानातून 300 किलो भगर जप्त केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , नवरात्रौत्सवास सोमवारपासून सुरूवात झाली आहे. घटस्थापनेच्या दिवशी अनेकजण उपवास पकडतात. त्याच अनुषंगाने लक्ष्मीआई तांडा व जुजगव्हाण येथील नागरिकांनी एका दुकानावरून भगरीचे पिठ आणले. ते खाल्याने दुपारनंतर अनेकांना मळमळ, उलटी, जुलाब, चक्कर येणे, थरथर होणे, पोटदुखी असा त्रास होण्यास सुरूवात झाली. काही लोकांनी बीड तर काहींनी ढेकणमोहा येथील खाजगी रूग्णालये गाठले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून या घटनेने खळबळ उडाली होती. तसेच गेवराई तालुक्यातील उमापूर , गुळज या ठिकाणी देखील अनेक जणांना भगरीतून विषबाधा झाली असल्याचे समोर आले आहे .
दरम्यान मंगळवारी गेवराईच्या मोंढ्यात अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री.गायकवाड यांनी तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केल्यानंतर मोंढ्यातील शितल एजन्सीतून 300 किलो भगर जप्त करण्यात आली. सदरची भगर खाण्यासाठी योग्य नसल्याने या एजन्सीचे मालक प्रमोद गंगावाल यांनी आधीच ही भगर दुकानात एका बाजूला ठेवत त्याची विक्री एकाही ग्राहकाला केली नव्हती अशी माहिती गंगावाल यांनी हाश्मी यांना दिली. या भगरीची बाजारात 20 हजारांच्या घरात किंमत असल्याची माहिती आहे. तसेच वरील केलेल्या कार्यवाई मध्ये अद्याप गुन्हा दाखल नसल्यामुळे या कार्यवाईवर संशय व्यक्त केला जात आहे .