गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद – पंचायत समिती मतदारसंघात कही खुशी कही गम
गेवराई दि. २८ ( वार्ताहर ) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा व पंचायत समितीच्या वीस , गट – गणातील आरक्षण जाहीर झाले असून, जिपचे पाच सर्कल “ओपन” , उमापूर एससी तर चार सर्कल ओबीसी बांधवांसाठी राखीव झाले आहेत. दरम्यान, आरक्षण जाहीर होताच गट-गणातील मतदारसंघात कही खुशी कही गम, असे चित्र दिसत आहे. मुंडावळ्या बांधून बसलेल्या
गाव पुढाऱ्यांचे मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. पंडितांचे युवराज कुठून नशीब आजमावणार, या विषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
गेवराई तालुक्यातील दहा जिप व वीस पंचायत समितीचे , गट आणि गण निहाय आरक्षण गुरूवारी ता. 28 रोजी जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सर्कल निहाय आरक्षणामध्ये रेवकी – ओबीसी महीला, तलवाडा- ओबीसी महिला, जातेगाव – ओपन सर्वसाधारण गढी – ओपन महिला, धोंडराई – ओपन महिला, उमापुर – अनुसूचित जाती महिला, चकलांबा- ओपन पुरुष, मादळमोही – ओबीसी, पाडळसिंगी- ओबीसी महिला, रूई – ओपन पुरुष गटाला राहणार आहे.
पंचायत समिती गणात आरक्षणामध्ये बागपिंपळगाव – सर्वसाधारण, रेवकी – सर्वसाधारण, आंतरवाली – सर्वसाधारण महिला, तलवाडा – सर्वसाधारण जातेगाव – ना. मा. प्र, रोहीतळ – सर्वसाधारण सिरसदेवी – सर्वसाधारण, गढी- सर्वसाधारण, राजपिंपरी- अ. जा. महिला, धोंडराई- अ. जा., गुळज – सर्वसाधारण महिला,उमापूर – ना. मा. प्र. महिला, चकलांबा -सर्वसाधारण,बंगालीपिपला – सर्वसाधारण महिला,कोळगाव – ना मा प्र. महिला मादळमोही – ना.मा. प्र., सिरसमार्ग – ना. मा. प्र. महिला, पाडळसिंगी – अ. जा. महिला, पाचेगाव – सर्वसाधारण महिला, रुई – सर्वसाधारण महिलेसाठी सुटले असून, मुंडावळ्या बांधून बसलेल्या अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. त्यांचा हक्काचा मतदारसंघ राखीव झाल्याने पंचाईत झाली आहे. रेवकी जिपच्या सभापती सविता बाळासाहेब मस्के या भाजपा कडून निवडून आल्या होत्या. त्यांनी अडीच वर्षात पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उडी मारली होती. मात्र, त्यांचा मतदारसंघ ओबीसी आरक्षणात गेला आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे. पाचेगाव जिप गटाचे सभापती श्रीमती जाधव यांचा मतदारसंघ पुनर्रचनेत उडाला असून, त्यांची अडचण झाली आहे. त्या शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या. गमंतीची गोष्ट म्हणजे, बप्पासाहेब तळेकर, बापूसाहेब चव्हाण, संग्राम आहेर, जयदीप औटी, संजय जाधव, भिष्माचार्य दाभाडे, सुरेश हात्ते, अरूण चाळक यांचे मतदारसंघ राखीव झाले आहेत.