January 22, 2025

त्या गुत्तेदाराला बक्षीस द्या; गेवराई – उमापूर – शेवगांव राज्य रस्ता दोनच महिन्यात उखडला

गेवराई दि. २७ (  वार्ताहर ) गेवराई -उमापूर- शेवगाव डांबरी रस्ता अवघ्या दोनच महिन्यात उखडला असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दरम्यान, अवघ्या दोन महिन्यातच रस्ता उखडल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून, रस्ता कामाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संबंधित ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने बक्षीस द्यावे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.

गेवराई शहरातून उमापूर कडे जाणारा जालना फाटा ते उमापूर पर्यंत चा रस्ता अत्यंत खराब झालेला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्याची दैन्य अवस्था आहे. हा राज्यमार्ग असून या ठिकाणाहून गेवराई मार्गे उमापूर, शेवगाव, नगर, शिर्डी, पुणे, मुंबई कडे जाता – येता येते. म्हणून, या रस्त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हाजारो वाहणे या रस्त्यावरून प्रवास करत असतात. मात्र, या रस्त्याची दैयनिय अवस्था संपलेली नाही. आमदार पवार यांच्या काळात हा रस्ता थोड्याफार प्रमाणात बरा झाला होता. त्यानंतर, या रस्त्यासाठी आ. पवारांनी आणखी निधी उपलब्ध केला होता. परंतू , भाजपा-सेनेचे सरकार गेले आणि 2019 साली ठाकरे यांचे आघाडी सरकार सत्तेवर आले. दुर्दैवाने त्या सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात, या रस्ता कामाला सुरुवात झाली नाही. आ. पवार यांनी संबंधित ठेकेदाराला अनेकदा सूचना केली. सरकारकडे पाठपुरावा ही केला. मात्र, गुत्तेदाराने रोज नवी नवी कारणे दिली. त्याने रस्त्यावर टाकलेल्या खड्डीवर झाडे उगवली, तरीही त्याने रस्ता केलाच नाही. अखेरीस गुत्तेदाराने मुहूर्त साधून दोनच महिन्यात काम उरकून घेतले. मनमानी कारभार केला. त्यानंतर, अवघ्या दोन महिन्यात रस्ता उखडायला सुरूवात झाली असून, पस्तीस ठिकाणी या नव्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. साईट पट्ट्या उखडू लागल्यात. वास्तविक पाहता, रस्ता तयार झाल्यावर दोन्ही साईडला मुरूम टाकायला हवा होता. त्यानेच काहीच केले नाही आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा काही सांगितले नाही. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या देखरेखीत संबंधित ठेकेदाराने हा रस्ता पंधरा दिवसांत पूर्ण केला होता. कंत्राटदाराने आलबेल कारभार केला असून, ओबडधोबड रस्ता करून भाडेखाऊ धोरण ठेवल्याने, उमापूरकरांच्या नशीबी पून्हा खड्यांचा रस्ता येण्याची चिन्हे आहेत. यंदाच्या पावसातच गेवराई- उमापूर-शेवगाव डांबरी रस्ता पूर्णपणे खराब झाल्याचे दिसून येत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत झालेला हा थातूरमातूर रस्ता पहिल्याच पावसात उखडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित कंत्राटदाराने दोन वर्षांपूर्वीच कोटीची रक्कम आधीच काढून घेतल्याची माहिती मिळाली आहे. गेवराई येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि बीडचे कार्यकारी अभियंता, या दोघांना मॅनेज करून हा सर्व मलिदा गुत्तेदाराने वसूल केल्याची चर्चा आहे. दरम्यान, दोन महिन्यातच रस्ता उखडल्याने, रस्ता कामाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संबंधित ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने बक्षीस द्यावे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरीकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *