मराठवाड्यातील ‘या’ आमदारांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा; इच्छुकांची लॉबिंगही सुरु
मराठवाड्यात शिवसेनेचे 12 आमदार असून, त्यापैकी नऊ आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
मुबंई दि २ ( वार्ताहार ) : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डावलले जाणार याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान मराठवाड्यातील सुद्धा काही आमदारांच्या नावांची मंत्रिपदासाठी सुरु आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे 12 आमदार असून, त्यापैकी नऊ आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे त्यापैकी काहींना संधी मिळणार तर भाजपमधील काही आमदारांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
औरंगाबाद: जिल्ह्यातील शिवसेनेच्या 7 आमदारांपैकी 5 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. ज्यात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल आणि रमेश बोरणारे यांचा समावेश आहे. त्यापैकी भुमरे, सत्तार आणि शिरसाट यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा आहे. सोबतच भाजपकडून आमदार अतुल सावे यांच्या नावाची चर्चा आहे.
लातूर: जिल्ह्याला गेल्यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये सुद्धा लातूरला मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. ज्यात संभाजी पाटील निलंगेकर व फडणवीसांचे विश्वासू अभिमन्यू पवार यांच्या नावाची चर्चा आहे.
उस्मानाबाद: जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आमदारांपैकी तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात साथ दिली. त्यात तानाजी सावंत आघाडीवर होते. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून राणा जगजीतसिंह पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे.
जालना: जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यात माजी आमदार अर्जुन खोतकर ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे जालन्यात भाजपला एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यात रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री असल्याने त्यांचा मुलगा संतोष दानवे यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा खूपच कमी आहे. राहिलेले आमदार नारायण कुचे आणि बबनराव लोणीकर यांच्यापैकी लोणीकर यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
हिंगोली: जिल्ह्याचा विचार केला तर भाजपचे तानाजी मुटकुळे यांच्या नावाची चर्चा आहे. कारण जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार संतोष बांगर उद्धव ठाकरेंच्या गटात होते. सत्ताधारी पक्षातील जिल्ह्यात एकमेव आमदार म्हणून तानाजी मुटकुळे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
परभणी: जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यात जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले राहुल पाटील हे ठाकरे यांच्या गटात आहे. तर भाजपच्या मेघना बोर्डीकर ह्या एकट्याच सत्ताधारी पक्षातील आमदार आहे. त्यामुळे आपली ताकद वाढविण्यासाठी भाजपकडून यावेळी मेघना बोर्डीकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते अशी चर्चा आहे.
बीड: कधीकाळी राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बीड जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यात राष्ट्रवादीची वाढती ताकद पाहता आणि आपल्या पक्षाला वाढवण्यासाठी भाजपकडून बीड जिल्ह्यात एक मंत्रीपद दिले जाऊ शकते. ज्यात पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. सोबतच सुरेश धस आणि आमदार लक्ष्मण पवार यांच्याही नावाची चर्चा आहे.
नांदेड: जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशी चर्चा आहे. त्याचबरोबर भाजप सत्तेत सोबत असल्याने निश्चितच भाजपच्या कोट्यातून नांदेडला मंत्रिपद मिळेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपकडून आमदार भीमराव केरेम आणि तुषार राठोड यांच्या नावाची चर्चा आहे.