टाकळगाव बॅरेज शेतकर्यांच्या जीवनात क्रांती घडवेल – अमरसिंह पंडित
सर्व्हेक्षण कामाचा टाकळगाव येथे भव्य शुभारंभ

गेवराई, दि.७ ( वार्ताहार ) सिंदफणा नदीकाठावरील बहुतांश शेतकरी कष्ट करणारे आहेत, कष्टकर्यांना पाणी उपलब्ध झाल्यास हे लोक उत्तम शेती करू शकतात, सिंदफणा नदीवरील टाकळगाव बॅरेज शेतकर्यांच्या जीवनात क्रांती घडवेल असा विश्वास माजी आ.अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. टाकळगाव बॅरेजच्या सर्व्हेक्षण कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
टाकळगाव (हिंगणी) कोल्हापूरी पध्दतीच्या बंधार्याचे उच्च पातळी बंधार्यात रुपांतर करण्याच्या कामास माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाली. या कामाच्या सर्व्हेक्षण व अन्वेषण कामाचा शुभारंभ शनिवार, दि.७ मे रोजी अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, माळापूरीचे उपसरपंच अशोक ढास, युवा नेते, शाहेद पटेल, सरपंच दत्ता तिपाले, माजी सरपंच मधुकर मुंजाळ, बिपीन डरफे, विकास सानप, अमजद पठाण, राम बुधनर, ताहेर पटेल, उपअभियंता विशाल हात्ते यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपअभियंता विशाल हात्ते यांनी प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व तपशिलवार माहिती सांगितली. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून जलसंधारण विभागात सहाय्यक अभियंता पदी निवड झालेल्या राज बाळासाहेब गव्हाणे यांचा सत्कार माजी आ.अमरसिंह पंडित यांनी या कार्यक्रमात केला.
यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून सिंदफणा नदीवरील बंधार्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात यश आले. राष्ट्रवादीचे नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मोठे सहकार्य केल्याचे आपल्या भाषणात पंडित यांनी सांगितले. सिरसमार्ग बॅरेज करताना टाकळगाव येथे सुध्दा बॅरेज होणे अपेक्षित होते, मात्र तत्कालीन राजकीय परिस्थितीत आपण विरोधी पक्षात असल्यामुळे कदाचित ही कामे होवू शकले नाहीत, याची खंत अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली. नाथापूर पासून सिरसमार्ग पर्यंत ५७ किमी सिंदफणा नदीच्या पात्रात एप्रिल आणि मे महिन्यात सुध्दा पाणी साठवून राहिले पाहिजे यासाठी माझे प्रयत्न असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सात बंधार्यांना मंजुरी दिली असून लवकरच त्यांचीही कामे सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
शेवटी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले, आज सर्व्हेक्षण कामाचा शुभारंभ होत आहे, मोठ्या गतीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करून पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण होतील असा विश्वास देताना वर्षभरात मुख्य कामाला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले. या भागातील शेतकर्यांना वरदान ठरणार्या या प्रकल्पाचा शुभारंभ खा.शरद पवार साहेब यांच्याहस्ते व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी सभापती अप्पासाहेब गव्हाणे, सरपंच अॅड.योगेश गव्हाणे, उपसरपंच अशोक गव्हाणे, संतोष कदम, रोहिदास ढगे, जीवन गव्हाणे, भगवान पंढरीनाथ गव्हाणे, विकास गव्हाणे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.