January 22, 2025

गेवराई तालुक्यात मनरेगा कामात लाखोंचा भ्रष्टाचार
मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ

संतप्त बदामराव पंडितांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

गेवराई दि २७  ( वार्ताहार  ) गेवराई तालुक्यात सन 2020 मध्ये झालेल्या मनरेगाच्या विविध कामांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून, कित्येक कामे बोगस झाली आहे. तालुक्यातील शेकटा येथील मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले असून चौकशीसाठी नियुक्त त्रिसदस्यीय समितीने याबाबत तसा अहवालही दिलेला आहे. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे संबंधितावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे संतप्त झाले असून, दोषी आढळून आलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील शेकटा येथे 2020 मध्ये झालेल्या मनरेगा योजनेअंतर्गत कामांमध्ये बोगसपणा झाला असून, त्यात लाखोंचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यासोबतच मयत असलेल्या लोकांना मजूर दाखवून त्यांच्या नावावर पगार उचलण्यात आला आहे. त्यासोबतच नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांची नावही मजुरांमध्ये दाखवून त्यांच्या नावावर पगार दाखवण्यात आला आहे. याबाबतची तक्रार शेकटा येथील ग्रामस्थांनी केली होती. या प्रकरणावर वेगवेगळ्या चौकशा झाल्या. त्यासोबतच अधिक चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचीही स्थापना करण्यात आली होती. या त्रिसदस्य समिती मध्ये असलेल्या चौकशी समिती प्रमुख डी डी जोगदंड, सहाय्यक लेखाधिकारी समिती सदस्य अरुण बुरांडे, स.का.अ. नरेगा कक्ष समिती सदस्य श्रीमती स्वाती कुटे या तिघांनीही येथील मनरेगाच्या कामात अनियमितता आणि नोकरदार व मयत लोकांच्या नावावर मास्टर मध्ये काम दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला आहे. तसा अहवालही या त्रिसदस्यीय समितीने संबंधित विभागाला दिलेला आहे. असे असतानाही या दोषी असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही किंवा ठोस कारवाई झालेली नाही. याबाबत शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी गावकऱयांसह वेळोवेळी जाऊन माहिती दिलेली आहे. तसेच कारवाईबाबतही मागणी केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपूर्वी बदामराव पंडित यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासन जिल्हा परिषद बीड श्री अजित पवार यांची भेट घेऊन गेवराई तालुक्यातील शेकटा येथील मनरेगा कामात भ्रष्टाचार केलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे याबाबत ठोस कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास येत आहे. याप्रकरणी वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आणि शेकटा येथील ग्रामस्थ यांनी याप्रकरणी भेट घेतली. मात्र या प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. तक्रार आल्यास एखाद्या मस्टरची चौकशी आणि कारवाई केली जाते. मात्र उर्वरित प्रकरणात दुर्लक्ष केले जाते. संपूर्ण तालुक्यात मनरेगा कामात भ्रष्टाचार झाला आहे. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. माझ्या कार्यकाळातील काही गैरव्यवहार असतील तर मला सांगा. मी येण्यापूर्वीचे घडलेले प्रकरण निपटायला माझ्याकडे वेळ नाही असे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी म्हटल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सदर प्रकरणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे समजते. या प्रकरणात माजी मंत्री बदामराव पंडित यांनी लक्ष घातल्याने संबंधित दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *