
‘तलवार नही, कलम जिंदा रखेगी तुमको’, सोलापुरात ओवेसींकडून ‘फुले आंबेडकरांचा’ धडा, नेमके काय म्हणाले? औवेसी
सोलापूर दि २३ ( वार्ताहार ) : राज्यात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा जोर धरताना पाहायला मिळत आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. इम्तियाज जलील यांनी आधी औरंगाबाद आणि आता सोलापूरमधून चलो मुंबईचा नारा दिलाय. सोलापूरमध्ये आज ओवेसी यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाचा मेळावा पार पडला. त्यावेळी ओवेसी यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसंच मुस्लिम समाजातील बांधवांना शिक्षणांचं महत्वही पटवून दिलं
‘यांना ओळखा, यांनी सत्तेसाठी, आपल्या परिवारासाठी, आपले खिसे भरण्यासाठी, आपली भ्रष्टाचाराची प्रकरणं लपवण्यासाठी यांनी धर्मनिरपेक्षतेला महाराष्ट्रात गाडून टाकलं. भाजप-शिवसेनेते कधीपासून फरक निर्माण झाला? हे लोक मोदींना रोखायचं आहे. मग काय करावं? तुम्ही सत्तेपासून दूर व्हा, पुन्हा निवडणूक घ्या. तुमच्याकडे इतका पैसा आहे ना. पण नाही… आमच्या विचारांची चेष्टा केली गेली. धर्मनिरपेक्षतेला गाडून टाकलं. आणि धर्मनिरपेक्षतेच्या कबरीवर या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या सत्तेचा महल बनवून इथे महाराष्ट्रात सत्ता गाजवत आहेत’, असा घणाघात ओवेसी यांनी केलाय.
‘एक पेन तुम्हाला जिवंत ठेवेल, तलवार नाही’
त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विसरली काय? आता मुस्लिमांच्या आरक्षणाची चर्चाच होत नाही. चर्चा केली जाते ती वानखेडेची. तो मुसलमान आहे किंवा नाही. अरे या मुसलमांना आरक्षण हवं त्याचं काय? आणि का हवंय मुसलमानांना आरक्षण… तुमच्याकडे किती लोकांच्या खिशात पेन आहे? हीच परेशानी आहे मुसलमानांकडून. पेन ठेवा खिशात, लिहा. पेन ठेवा खिशात. तो तुम्हाला जिवंत ठेवेल, तलवार जिवंत ठेवणार नाही, पेन ठेवेल, अशा पोटतिडकीचा सल्लाही ओवेसी यांनी मुस्लिम बांधवांना दिला आहे.
‘काँग्रेस, राष्ट्रवादी आता तोंड दाबून का बसली?’
मी उद्धव ठाकरेंना विचारतो, मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या इंटरिम ऑर्डरमध्ये सांगितलं नाही का की, महाराष्ट्रात मुस्लिमांमध्ये 50 किंवा 55 जाती आहेत त्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं. कारण त्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहेत. उच्च न्यायालयाने सांगितलं होतं आणि म्हटलं होतं की शिक्षणात आरक्षण द्या. नोकरीमध्येही देऊ शकतो पण नोकरीतील आरक्षणाचा कोटा वाढला. त्यामुळे शिक्षणात द्या. तुम्ही का दिलं नाही? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तोंड दाबून बसली आहे का? ही तुमची मुस्लिमांबद्दलची आस्था आहे का? असा खोचक सवाल ओवेसी यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला केलाय.
राज्यात किती टक्के मुस्लिम पदवीधर? ओवेसींकडून खंत व्यक्त
महाराष्ट्रात 11 टक्के मुस्लिम आहेत. त्यातील किती मुस्लिम पदवीधर आहेत. तर फक्त चार टक्के. मुस्लिमांचा शिक्षणातील ड्रॉप आऊट रेट पाहिला तर धक्कादायक आहे. मुस्लिम प्रायमरी स्कुलमध्ये 22 टक्के असेल तर मिडलमध्ये येताना 13 टक्के होतो. मॅट्रिकमध्ये येता येता 12 टक्के होतो. तोच हाय सेकंडरीमध्ये येता येता तो 7.1 टक्के होतो. तर पदवीधर फक्त 4 टक्के उरतात, हा गंभीर मुद्दा उपस्थित करत ओवेसी यांनी मुस्लिमांना शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.