दिव्यांग शाळेतील शेकडो कर्मचाऱ्यांचे दिव्यांग कल्याण आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन

दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे                         

                   गेवराई: दि ९ ( वार्ताहार ) 
राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिक्षक भारती विशेष शाळा / कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने दि.८ मार्च मंगळवार रोजी पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करुन शेकडो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी विविध मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करुन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

शिक्षक भारती विशेष शाळा कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना बीड जिल्हा यांच्या पुढाकाराने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष लहुराव ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग कल्याण आयुक्तालयावर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी व अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी भव्य मोर्चा काढून एक दिवसीय तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मुंबईचे जिल्हाध्यक्ष विलासराव पंडित, बीड जिल्हाध्यक्ष लहुराव ढोबळे, सचिव अशोकराव चव्हाण, कार्याध्यक्ष फुलचंद लुचारे, पुणे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, सचिव कैलास गायकवाड यांच्यासह राज्यातील दिव्यांग शाळेतील शेकडो कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

धरणे आंदोलनात पुढीलप्रमाणे मागण्या होत्या सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांची डी.सी.पी.एस मध्ये जमा असलेली रक्कम अधिक शासनाकडून मिळणारी रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसास तात्काळ मिळावी. काळजीवाहक कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय मान्यतेच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षे केलेली सेवा संबंधित कर्मचाऱ्यास देण्यात येणाऱ्या बारा वर्ष निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावी.वस्तीगृह अधीक्षक, सफाईगार, पहारेकरी, मदतनीस या कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनात बाबतचा अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यात यावा. तसेच दिव्यांगांच्या विशेष शाळांची तपासणी शासनाने ठरवून दिलेल्या तपासणी अहवालानुसार व्हावी तसेच शाळा तपासणी नंतर तपासणी अहवालाची एक प्रत तपासणी अधिकाऱ्याने साक्षांकित करून शाळा प्रमुखास मुख्याध्यापक यांना देण्यात यावी परंतु बोगस संघटनेच्या अथवा व्यक्तींच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या तक्रारी निवेदनाद्वारे कुठलीही शहनिशा न करता दिव्यांग शाळांची तपासणी करण्यात येऊ नये. तसेच एकाच विषयावर संघटना/ व्यक्ती यांनी तक्रारी/निवेदन देणे वारंवार माहिती मागणाऱ्या संघटना व्यक्ती यांच्यावर दि.१४ ऑक्टोंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार आपल्या स्तरावर कठोर कारवाई करण्यात यावी. यासह आदि मागण्याद्वारे दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या सादर करण्यात आल्या. तरी वरील विषयांबाबत योग्य ती कारवाई होऊन संबंधित संस्था व दिव्यांग शाळेतील कर्मचारी यांना न्याय मिळावा अशा मागण्या दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांच्यासमोर व्यक्त करण्यात आल्या. यावेळी वरिल मागण्यांबाबत पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करुन मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेवू असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. धरणे आंदोलनात बीड, मुंबई, पुणे, सह आदि राज्यातील शेकडो कर्मचारी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *