April 19, 2025

अनाथांना गोंजारणारे हात गरजेचे आहेत – संतोष गर्जे

                   गेवराई, दि. २४ ( वार्ताहार ) 

असुरक्षितता आणि अनिश्चितता या दोन गोष्टींमुळे अनाथांचे आयुष्य कमालीचे अडचणीत आहे. अशा मुलांचे भरण-पोषण करुन केवळ शारीरिक विकासच फक्त साधला जाऊ नये, तर अशा विद्यार्थ्यांना स्पर्शाची जास्त गरज आहे. अन्नदान आणि आर्थिकदान याप्रमाणेच स्पर्शदान ही बाब या अनाथ चिमुकल्यांसाठी आवश्यक आहे.असे प्रतिपादन बालग्रामचे संचालक संतोष यांनी केले .राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते .

देशासाठी चांगले नागरिक घडविताना आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. अशा मुलांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जगण्याची नवी उमेद प्राप्त होते. अनाथ बालिकांचे संगोपन ही त्यातल्यात्यात एक मोठी जबाबदारी आहे. या संपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करताना आम्हाला सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना समाजातील जाणकारांची जास्त आवश्यकता आहे’ असे मत समाजसेवक संतोष गर्जे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्याहस्ते असंख्य अनाथ बालिकांचे पालक म्हणून प्रीती गरजे आणि संतोष गर्जे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, महिला कक्ष अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सत्कारास उत्तर देताना प्रीती गर्जे आणि संतोष गर्जे यांनी आपले अनाथालयाशी संबंधित कार्यानुभव उपस्थितांना सांगितले. हे अनुभव ऐकताना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अनेक हृदयद्रावक घटनांची माहिती संतोष गर्जे यांनी दिली. सद्यस्थितीमध्ये देशातील नागरिक या नात्याने सर्वांच्या जबाबदारीचे भान त्यांनी लक्षात आणून दिले.

यावेळी उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, पर्यवेक्षक प्रा. चंद्रकांत पुरी, अंतर्गत तक्रार निवारण आणि महिला कक्ष प्रमुख डॉ. सुदर्शना बढे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. डॉ. व्ही. एम. जयसिंगपुरे यांनी प्रास्ताविक केले, समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. वृषाली गव्हाणे यांनी आभार मानले. सदरील कार्यक्रम महाविद्यालयाच्या फेसबुक पेज वरूनही प्रक्षेपित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *