April 19, 2025

आरोग्य विभागाला लकवा 

गेवराई तालुक्यातील 46 आरोग्य केंद्रात साधी पॅरासिटामल गोळी शिल्लक नाही

              गेवराई दि. 16 ( वार्ताहर ) 

तालुक्यातील आरोग्य विभागाला लकवा झाला असून, 46 आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आरोग्य सुविधांचा अभाव आहे. गोरगरीब रुग्णांसाठी असलेल्या या रुग्णालयात साधी पॅरासिटामल गोळी शिल्लक नाही. कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. अनेक इमारतींना तडे गेलेत. म्हणे, 41 लाख पॅरासिटामल गोळ्या येणार आहेत. त्या कधी येतील ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात सरकारी आरोग्य केंद्र आहेत. 6 आरोग्य केंद्र व 40 उप केंद्र कार्यरत आहेत. या केंद्राचा कारभार सेवेत असलेले डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर आहे. परंतू ,या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी लागणारी ओषधी शिल्लक नाही.सर्दी, पडसे, अंगदुखी, तापीच्या आजारावर उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना पॅरासिटामल नावाची गोळी दिली जाते. ही गोळी महत्त्वाची मानली जाते. नेमकी हीच गोळी गेल्या काही दिवसांपासून
एकाही आरोग्य केंद्रात उपलब्ध नाही. डिलिव्हरी साठी येणाऱ्या महिलांनायोग्य वागणूक दिली जात नाही. अनेक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी अरेरावी करतात,अशा तक्रारी आहेत. मादळमोही केंद्रात बाळंतपणा साठी आलेली एक गरोदर महिलेची रुग्णालयाच्या आवारात प्रसूती झाली. तिला साधी मदत ही करण्यात आली नाही. उलट, तिला व तिच्या नातेवाईकांना खडसावून खराब झालेली जागा साफसूफ करून घेतली. असभ वर्तन करून, बाळंतीण महिलेला अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यावर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. ग्रामीण भागातून संबंधित घटनेनंतर तिव्र संताप व्यक्त करण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांना ही या बाबींची माहिती आहे.त्यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना समज दिली आहे. त्याचा काहीएक परिणाम झालेला नाही. तालुक्यात मादळमोही, जातेगाव, नि. जवळका, तलवडा, चकलांबा, उमापूर सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात आरोग्य केंद्र आहे. येथे ही आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाहीत. उपकेंद्रात या पेक्षा वाईट अवस्था झालेली आहे. काही केंद्रात कर्मचारी नाहीत. इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्या इमारती दुरुस्त करण्यासाठी शासनाकडे खर्च नाही. बेड भंगारात शोभून दिसतील अशा अवस्थेत आहेत. अनेक आरोग्य केंद्राची शोभा झाली असून, ही केंद्रे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा, अशा अवस्थेत उभी आहेत. या सर्वच आरोग्य विभागाला लकवा झाला असून, 46 आरोग्य केन्द्र, उपकेंद्रात आरोग्य सुविधांच नाहीत. गोरगरीब रुग्णांसाठी असलेल्या या रुग्णालयात साधी पॅरासिटामल गोळी शिल्लक नाही. म्हणे, 41 लाख पॅरासिटामल गोळ्या येणार आहेत. त्या कधी येतील ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *