April 19, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या समाजसुधारक नसून क्रांतिकारक – प्रतिभा अहिरे

              गेवराई, दि. 15 ( वार्ताहार )

‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना समाज सुधारक मानने आणि समाज सुधारक म्हणणे चुकीचे आहे. कारण त्यांचे कार्य हे समाजसुधारणेचे नसून समाजासाठी क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. जाती विरहित, शोषणमुक्त, भयमुक्त, अज्ञानमुक्त समाज निर्मितीसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले. नवीन समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले कार्य हे क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. याच क्रांतिकारक कार्यामुळे महिलांच्या जीवनात अमूलाग्र क्रांती घडून आली. संकुचित जगण्यातून बाहेर पडून आपण आज जीवनाची विविध क्षेत्रे पादाक्रांत करत आहोत याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी त्यांच्या काळात केली. त्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या केवळ पत्नी म्हणून नाही, तर स्वतः ची ठळक नाममुद्रा उमटविणाऱ्या क्रांतिकारक होत्या’. असे मत ज्येष्ठ कवयित्री – व्याख्यात्या डॉ. प्रतिभा अहिरे यांनी व्यक्त केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ.अट्टल महाविद्यालय आयोजित’ जिजाऊ – सावित्री – फातिमा व्याख्यानमाला’ अंतर्गत पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.

स्वराज्य प्रेरिता राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्ञानज्योती फातिमा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत उद्घाटनपर व्याख्यान प्रसंगी कवयित्री प्रतिभा अहिरे यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेतस्त्री’याविषयावर विचार मांडले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे यांच्यासह मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. आभासी पद्धतीने झूम आणि फेसबुक पेजवरून हे व्याख्यान संपन्न झाले.
व्याख्यानमालेचे संयोजक समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वृषाली गव्हाणे यांनी प्रतिभा अहिरे यांचा परिचय करून दिला, तर प्रा. शरद सदाफुले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाल गायिका नभा इंगळे व अमरजीत बाहेती यांनी सावित्रीबाईंना अभिवादन करणारे गीत सादर केले.
शनिवार, दि. 15 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ‘स्वराज्य प्रेरिता राजमाता जिजाऊ’ या विषयावरील व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ज्येष्ठ विचारवंत ॲड. पुरुषोत्तम खेडेकर हे गुंफणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *