April 19, 2025

बांगर यांच्यावरील कारवाईचा करा फेरविचार – पोटभरे

 

                       बीड दि. 14 ( वार्ताहार ) 

प्रा. शिवराज बांगर हे शिव-शाहू-फुले-आंबेडकर  चळवळीतील काम करणारे आघाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात  वेगवेगळ्या विषयावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील आंदोलने केलेली आहेत. सामाजिक अन्याय, अत्याचाराच्या विरोधात प्रा. शिवराज बांगर यांनी नेहमीच आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे माजी बीड  जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्यावर बीड जिल्हा प्रशासनाने एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंध कायदा) अंतर्गत दि.८ जानेवारी २०२२ रोजी कारवाई करून त्यांना औरंगाबाद येथील हार्मुल कारागृहात जेरबंद केले आहे. पोलीस प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने झालेल्या एमपीडीएच्या कार्यवाहीवर जिल्हाधिकारी यांनी फेर विचार करावा आणि स्थानबद्धतेची केलेली कार्यवाही मागे घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी यांची भेट घेवून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  प्रा. शिवराज बांगर यांनी बीड जिल्ह्यातील वंचित समाजाच्या कल्याणासाठी  लोकशाही मार्गाने सतत सक्रीय आंदोलने केलेली आहेत. वेळ प्रसंगी लोकशाही मार्गाने आक्रमक भूमिका देखील त्यांनी घेतलेली आहे. प्रा. शिवराज बांगर हे खुणी, अत्याचारी नाहीत. तसेच त्यांचे मटका, जुगार, अवैध दारू, अवैध  अमली पदार्थ किंवा नंबर २ चे धंदे नाहीत. आजतागायत त्यांनी कोणताही मोठा गंभीर गुन्हा केलेला ऐकवात नाही. चळवळीतील कार्यकर्त्यांना टारगेट करण्याचा प्रयत्न सध्या होत असला तरी प्रा. शिवराज बांगर यांच्या पाठीशी संपूर्ण आंबेडकरवादी बहुजन समाज आहे हे लक्ष्यात घ्यावे असेही पोटभरे यांनी म्हटले  आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडून प्रा. शिवराज बांगर यांचा अहवाल मागवून त्यावर फेर विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. प्रा. शिवराज बांगर यांच्यावर केलेली कार्यवाही ही चुकीची असून त्यांच्यावर केलेली कार्यवाही रद्द करण्यात यावी अशी मागणी बहुत विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली. यावेळी कचरू खळगे, श्रीहरी मोरे, नवनाथ धाईजे, प्रदीप पट्टेकर, जयसिंग तांगडे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *