April 19, 2025

स्पर्धा परीक्षेच्या पुर्व तयारीसाठी नाशिक मध्ये प्रशिक्षणांचे आयोजन

नाशिकः दि २४ ( वार्ताहार ) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना एक सुवर्ण संधी. त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी सरकारकडून चक्क मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ ज्यांना घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श. बा. जाधव यांनी दिली आहे.

अशी होणार निवड?

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, कळवणमार्फत स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्याकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी उमेदवारांची निवड 26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता कळवण येथे मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना त्यांची रहाण्याची व भोजनाची सोय स्वत: करावी लागणार आहे व यासाठी कोणातही प्रवासखर्च उमेदवारांना दिला जाणार नाही, असे कळवण्यात आले आहे.

काय आहे पात्रता?

प्रशिक्षणाची प्रमुख अट म्हणजे यासाठी आदिवासी उमेदवारच पात्र असतील. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे अशी असून, शैक्षणिक अर्हता किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना 1 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येतांना स्वत:चे 12 वी पास गुणपत्रक, जात प्रमाणपत्र, स्वत:च्या नावे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रत तसेच एक पासपोर्ट साईजचा फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी पुन्हा अर्ज सादर करू नये, असे कळवण्यात आले आहे.

कधी होणार प्रशिक्षण?

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 1 डिसेंबर 2021 पासून पुढील साडेतीन महिने कालावधीकरिता असणार आहे. या प्रशिक्षणांतर्गत शिपाई, लिपीक, ग्रामसेवक, तलाठी अशा वर्ग 3 व वर्ग 4 तसेच इतर पदांकरिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत तयारी करून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जुने तहसील कार्यालय आवार, नेहरू चौक, तालुका कळवण, जिल्हा नाशिक, पिनकोड 423501 या ठिकाणी वेळेत हजर रहावे, तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचा 02592-299973 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *