अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार
केज दि.२३ – एका १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध प्रस्थपित करून तिला लग्नाचे आमिष दाखवत पुण्याला पळवून नेले. तेथे तिच्यावर दोन महिने अत्याचार केल्याची माहिती मुलीच्या जबाबवरून समोर आली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय मुलीसोबत खंडू दत्तात्रय झिंझुर्डे याने प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्याशी जवळीक वाढविली. त्यानंतर त्याने मी तुझ्यासोबत लग्न करतो असे आमिष दाखवून तिला पुण्याला पळवून नेले. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र पोलिसांना दोन महिने त्या दोघांचा तपास लावण्यात अपयश आले होते.
दरम्यान, दोन महिन्यानंतर खंडू झिंझुर्डे हा या अल्पवयीन मुलीला घेऊन नाशिक येथील नातेवाईकांकडे आल्याची माहिती युसुफवडगाव पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात फौजदार रियाज शेख, पोलीस नाईक डोंगरे यांनी नाशिकला जाऊन खंडू झिंझुर्डे व पीडित मुलीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले. पीडित मुलीने दिलेल्या जबाबात खंडू झिंझुर्डे याने लग्नाचे आमिष दाखवून पुण्याला पळवून नेले. तेथे एक खोली करून तिच्यावर दोन महिने अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या जवळील पैसे संपल्यावर नाशिकच्या नातेवाईकांकडे घेऊन आल्याची माहिती दिली. याप्रकरणी सदर गुन्ह्यात बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खंडू झिंझुर्डे याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पिंक मोबाईल पथकाच्या फौजदार सीमाली कोळी पुढील तपास करत आहेत.